सध्या मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कामगिरीच्या
जाहिराती सगळीकडे जोरात सुरू आहेत. त्या जाहिरातीत मागील सत्तर वर्षांत काहीच घडलं
नाही पण मोदींच्या चार वर्षांत भारत बदलला असा दावा करण्यात येतोय. दुसरं म्हणजे
भाजपनं नाही तर मोदींनी प्रत्येक गोष्ट केलीय असं सांगण्यात येतंय. सरकार मोदींचं
नाही. ते भाजपचं आहे. देशाचं सरकार आहे. पण याची आठवण यांना असेल असं काही वाटत
नाही. आपल्या कामांची जाहिरात करणं योग्य नाही असं नाही. पण ती करताना त्यांत सत्य
असावं ही किमान अपेक्षा असते. मागील सरकारांनी काहीच केलं नाही असं धडधडीत खोटं
बोलायचं. वारंवार बोलायचं हा एकच अजेंडा मोदीप्रणीत सरकारचा आहे. एखादी खोटी गोष्ट
हजार वेळा सांगितली की लोकांना ती खरी वाटू लागते हे तंत्र गोबेल्सनं हिटलरच्या
राजवटीत सिद्ध केलं होतं. सध्याचं सरकार गेली चार वर्षं हेच करतेय. सत्तर वर्षांत
काहीच घडलं नाही जे काही केलं ते फक्त आम्हीच केलं ही एकच गोष्ट ते वारंवार
सांगताहेत. या मूर्खपणाला हसताही येत नाही कारण ही देशाच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर
बाब आहे. पण मतांच्या राजकारणात देशाच्या हिताचा विचार करण्याचा सुजाणपणा भाजप
नेत्यांमध्ये राहिलेला नाही. मोदी सतत विदेशात जाऊन आणि अमित शहा भारतात राहून
मागील सत्तर वर्षांत काहीच झालं नसल्याचा दावा करतात. तर बाकीचे दुय्यम नेते दर
रोज रामायण किंवा महाभारत काळातले नवनवीन शोध लावतात. मग कोणी म्हणतो की महाभारत
काळात इंटरनेट होतं तर दुसरा कोणी म्हणतो की सीता ही टेस्ट ट्यूब बेबी होती. याच
लोकांनी पूर्वी विज्ञानाला नाकारलं होतं. आता ते त्याच विज्ञानाचं अपहरण करून सारं
काही आमच्या पूर्वजांनी आधीच शोधून काढलं होतं याचे निर्लज्ज आणि हास्यास्पद दावे
करत आहेत.
साफ नियत सही विकास ही मोदी सरकारची नवी जाहिरातबाजी
सध्या सुरू आहे. त्यांत या सरकारनं केलेल्या कामांची उजळणी केली तर त्यांचा
आरंभशूरपणा तितका त्यांतून दिसून येतो. दर महिन्यांत नवीन योजना सुरू करायची पण
त्याची कोणतीच पूर्वतयारी करायची नाही आणि एकदम देशभरांत ती लागू करून करोडो
लोकांना त्याचा फायदा झाला असं बिनदिक्कत जाहिर करायचं. मग ती उज्ज्वला योजना असो
किंवा जनधन योजना असो. त्या सुरू झाल्या आणि बंद पडल्या. कारण पूर्वतयारीचा अभाव.
पायाभूत सुविधांचा अभाव. पण स्वतःची मिरवणूक काढायला उतावीळ असलेल्या मोदी सरकारला
याच्याशी काही देणंघेणं नाही. त्यांना फक्त आपली जाहिरात करायची असते. प्रत्यक्षात
त्यांची कामगिरी पाहिली तर साफ करने की नियत आणि खुदका सही विकास असं त्यांच्या
जाहिरात मोहिमेला नाव दिलं तर ते योग्य ठरेल. मोठमोठे उद्योगपती राष्ट्रीय बँका
साफ करून परदेशांत जाऊन बसलेत. चार वर्षांत बीजेपीच्या नेत्यांनी शेकडो पटींनी
आपली संपत्ती वाढवली आणि स्वतःचा विकास करून घेतला. मागील चार वर्षांत हेच घडलंय.
पण लोकांना हे कधी कळणार हाच खरा प्रश्न आहे. बाकी
जनतेची जी लायकी असते तसंच सरकार त्यांना भेटतं असं म्हणतात ते काही खोटं नाही.
सामान्य जनताही खोटारडी, घोटाळेबाज, बेशिस्त, अनैतिक, बेजबाबदार, लालची, लबाड
असल्यावर तिचं सरकार वेगळं असेल अशी अपेक्षा करणं चूकीचंच ठरेल. दूर्दैवानं
भाजपच्या तुलनेत उत्तम विरोधी पक्षाचा पर्याय आहे म्हणावं तर तेही नाही. त्यामुळे
भारताचा या ना त्या मार्गानं विध्वंस सुरूच राहणार आहे. पण निदान त्यांच्यावर काही
प्रमाणात अंकूश बसावा म्हणून तरी पुढील वर्ष नवीन राजकीय पक्षाला सत्ता
स्थापण्याची संधी जनता देईल अशी अपेक्षा करावी लागेल. अन्यथा खोटारटेपणाची आणखी
पाच वर्षे आपल्या माथी मारली जातील हे नक्की.
No comments:
Post a Comment