Monday, 29 May 2017

भाग ५ - मोदी सरकार आणि फॅसिझमचा धोका

विरोधी मत असणं हे वैविध्यतेचं लक्षण असतं. पण फॅसिझममध्ये सामान्य लोकांना इतरांचं काल्पनिक भय दाखवून, शत्रू देशांविरूद्ध भावना भडकवत ठेवून, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पिळवणूक करत त्यांचं हे भय पराकोटीला चढवणं आणि त्यांना कायम या भयात डांबून ठेवणं हे फॅसिझमचं सूत्र आहे. फॅसिझम हा उघडपणे वांशिक असतो असं इको म्हणतो. आपल्या देशाची विविधता हेच त्याचं बलस्थान आहे, वैशिष्ट्य आहे असं आपण म्हणतो, त्याचा आपण सर्व आदरही राखतो. आणि हे मान्यच करायला पाहिजे की अशा पद्धतीचं जगणं जगात अभावानंच आढळतं. आपण अशा गोष्टींचा अभिमान बाळगायला हवा. तो बाळगतोही. पण त्याचवेळी असे अनेक घटक आहेत ज्यांना हे वैविध्य मान्य नाही. त्यांना अखंड भारत हवा आहे. त्यांना सारे हिंदू हवे आहेत. त्यांना विरोधाचा स्वर मान्य नाही. त्यांना विरोध करणं हे स्वतंत्रतेचं व विवेकाचं लक्षण असतं हे मान्य नाही. मी कोणाबद्दल बोलतोय ते स्पष्ट आहे. ही संघाची विचारसरणी आहे. त्यांना एकच देश, एकच धर्म, एकच विचारधारा, एकच संस्कृती हवी आहे. पण ती इतरांना हवी आहे की नाही याचा विचार करायला ते तयार नाहीत. या देशात हिंदू बहुसंख्य आहेत म्हणून त्यांचं इतरांनीच ऐकायलाच हवं असा त्यांचा आग्रह असतो. आणि अनेकांना यात काही वावगं वाटत नाही कारण अत्यंत हुशारीनं या गोष्टी त्यांच्या डोक्यात भिनवलेल्या असतात. पण याला इतरांचं जाऊ द्या हिंदूचाही विरोध आहे, असू शकतो हे त्यांना मान्य नाही. मग अशा विरोधकांनी संस्कृतीविरोधी, धर्मविरोधी, देशविरोधी लेबलं लावून त्यांचा धिक्कार केला जातो. इतरांची गोष्टच सोडा. हे झालं संघाचं. पण इतरांचं काय? त्यांचीही तिच स्थिती आहे. त्यामुळे फक्त संघाला दोष देण्यात अर्थ नाही. या सा-यांना त्यांच्या मनातला एकसंध भारत हवा आहे, त्यांच्या मनातली संस्कृती त्यांना इथे हवी आहे ज्यात स्वतंत्र विचारांना स्थान नाही. विरोधी मताला मान नाही. विरोधी लोकांप्रती ज्यांना आदर नाही. काल्पनिक किंवा वास्तवाची अवास्तव मांडणी करून लोकांना भयभीत करणं, त्यांचा बुद्धीभेद करणं, त्यांच्या भावनांचा गैरफायदा घेऊन त्यांना भडकावनं, फसवणं हे सारे प्रकार या देशात सुरू आहेत. या देशात फॅसिस्टवृत्ती नाहीत असं म्हणनं योग्य ठरणार नाही.

Sunday, 28 May 2017

भाग ४ - मोदी सरकार आणि फॅसिझमचा धोका

१-       विल्यम रीचने नामकरण केलेल्या सेक्स पॉझिटीव्ह या विचारसरणीची मध्यवर्ती कल्पना आहे की, समाजातल्या लैंगिक समस्यांचं मूळ हे लैंगिकतेकडे पाहाण्याच्या नकारात्मक दृष्टिकोनात आहे. जर या समस्यांवर तोडगा काढायचा असेल तर या दृष्टिकोनातच आमूलाग्र बदल केला पाहिजे. यासाठी पोर्नोग्राफीपासून ते समलिंगी संबंधांपर्यंत लैंगिकतेच्या सर्व आविष्कारांना मोकळीक दिली पाहिजे. फक्त ते सुरक्षित व स्वखुशीने असल्याची जबाबदारी घेतली की झालं.
-    याला सारेच मान्यता देतील यात शंकाच आहे. कारण हा व्यक्तिगत निवडीचाही प्रश्न आहे. पण यातील महत्त्वाची बाब म्हणजे आपण लैंगिकतकडे सकारात्मक दृष्टीने पहायला हवं. त्यांचं नैसर्गिकत्त्व आपण स्विकारायलं हवं. ही काही भयानक गोष्ट आहे यातून आपण दूर व्हायला हवं. निदान याची सुरुवात आपण केली तर आपली पुढची पिढी अधिक काम साक्षर व काम सकारात्मक बनेल.
२-       योनिशुचितेचं अवडंबर माजवून स्त्रियांना सतत बलात्काराच्या भीतीखाली डांबलं जातंय. स्त्रीचं चारित्र्य तिच्या जननेंद्रियात आहे, अशी समजूत उराशी बाळगून स्त्रिया संपूर्ण आयुष्य भीतीच्या छायेत काढतात. जननेंद्रियांना काही झालं तर आपल्या चारित्र्यावर डाग पडेल, स्त्रीची अब्रू म्हणजे काचेचं भांडं असल्या समजुतींनी तर ही भीतीची छाया अजूनच गडद होते. आपल्या जननेंद्रियांना पुरुषांपासून धोका आहे, असं समजून जीवनातले एकेक अनुभव त्या बंद करत जातात. उदाहरणार्थ, रात्री न भटकणं किंवा भडक कपडे न घालणं. अशा कितीतरी स्वातंत्र्यांना योनिशुचितेच्या अवाजवी भयामुळे त्या मुकत जातात. स्त्रियांचं सबलीकरण करायचं असेल तर त्यांना शारिरीकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच त्यांचं मानसिक सबलीकरण केलं पाहिजे. मानसिक सबलीकरण म्हणजे योनिशुचितेचं अवडंबर मोडून काढणं. जननेंद्रियांना शरीराच्या इतर भागांपेक्षा वेगळं महत्त्व द्यायचं कारण काय? तसं वेगळं महत्त्व देऊन उभा जन्म भीतीच्या छायेत काढण्यापेक्षा या भीतीचाच समूळ नाश करावयास हवा. दुर्दैवाने जननेंद्रियांवर हल्ला झालाच तरी कोसळून जायचं कारण नाही. तो तिथे झालेला अपघात समजावा. शरीराच्या इतर अवयवांना अपघात झाला तर आपण सावरतोच ना? मग जननेंद्रियांना वेगळी वागणूक का द्यायची? कुठले कपडे हमखास घातले किंवा कुठली वेळ नेमकी टळली की लैंगिक हिंसाचाराच धोका टळेल याचीही निश्चिती नाही. याचा अर्थ मुद्दामहून जाऊन धोका ओढवून घ्यायचा नाही, पण तसं होईलंच म्हणून सतत धास्तावून जाण्याचंही कारण नाही. एकदा का धास्तीतून बाहेर पडलं की बंद करून घेतलेले अनेक अनुभव जगता येतील. आपण जितके वेगवेगळे अनुभव घेऊ तेवढी आपली जीवनाबद्दलची समजूत अधिक समंजस होईल. माझ्या मते तेच खरं सबलीकरण आहे.
बलात्काराच्या संदर्भात हा अतिशय महत्त्वाचा विचार आहे. यातील पहिली गोष्ट म्हणजे योनी हा फक्त एक अवयव आहे हे शारिरीक वास्तव स्वीकारणं. हात, पाय, नाकाला इजा झाली तर त्याला ज्या वेदना होतात त्याच वेदना इथेही होतात. त्यामुळे त्याला वेगळं महत्त्व देण्याचं कारण नाही हे आधी स्त्रियांनी समजून घ्यायला हवं. आणि त्यांच्या लोकांनीही. घरच्यांनी, समाजाने. दुसरा मुद्दा आहे मानसिकतेचा. मानसिक आघात कसा विसरायचा याचा. मी कबूल करतो की याबाबतीत मी ठामपणे सांगू शकत नाही. पण आधी सांगितल्याप्रमाणे नको ते स्पर्श सहन न होणे, आपल्या शरीरावर आपल्या मर्जीशिवाय इतरांचे स्पर्श न होऊ देणं आणि ते झालेच तर काय? मी बलात्काराचा नाही पण लैंगिक छळाचा अनुभव घेतला आहे. छळ हा गंभीर शब्द होईल. छळ नाही पण नको असलेला लैंगिक क्रिया. समलैंगिक पुरुषांनी माझ्या लिंगाला हात लावण्याचा अनुभव मी दोनतीन वेळा घेतला आहे. जे मुंबईत राहतात आणि लोकलमध्ये प्रवास करतात त्यांना कधीतरी असे अनुभव येतातच येतात. ते अनुभव मी आजही विसरलो नाही. अर्थात त्यामुळे मला काही शारिरीक, मानसिक त्रास झाला नव्हता. किंवा मी हे अनुभव माझ्या मित्रांना सांगितल्यावर त्यांनी मला वाळीत टाकलं नव्हतं. त्यांनीही त्यांचे असे अनुभव मला सांगितले होते. आणि हे सारं हसण्याच्या कल्लोळात. एखादी बलात्कारीत मुलगी हसत असा अनुभव सांगणार नाही हा यातला फरक. बलात्कार हे पुरुषांवरही होत असतात हे मात्र आपण इथे विसरायला नको. पण स्त्रियांच्या तुलनेत त्यांची तीव्रता व गांभीर्य कमी आहे. कारण योनीशुचितेची होणारी मागणी. सध्याच कौमार्य परीक्षेविषयीची एक बातमी गाजली होती. ही परीक्षा पुरुषी संस्कृतीचा परिपाक आहे. अशा बलात्कारातून मुली गर्भवती राहिल्या तर अधिकच अडचण. यातून मार्ग कसा काढायचा तर तो पुन्हा आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहे. तुम्ही या घटनेकडे कसं पाहता, स्वतः त्याला कसे सामोरे जाता किंवा अशा मुलीबाबत तुम्ही काय विचार करता याला इथं फार महत्त्व आहे. इतरांचं राहू द्या तुम्ही कसे या घटनेकडे बघता हे सर्वांत महत्त्वाचं. तो निकोप दृष्टिकोन असणं गरजेचं आहे. शंका असतील तर त्या विचारा आणि प्रश्न असतील तर त्याची उत्तरं शोधा पण या समस्येवर काहीतरी भूमिका आपण प्रत्येकानं घ्यायलाच हवी. 

Saturday, 27 May 2017

भाग ३ - मोदी सरकार आणि फॅसिझम

परंपरावाद हा आधुनिकतेला नकार देतो. आपल्या घरापासून सुरूवात केली तरी हे स्पष्ट होतं. आपल्या आईवडीलांना आपले विचार पटत नसतात आणि आपल्याला त्यांचे. समाजात गेलो तर समाजाला काही गोष्टी खटकतात आणि त्यावरून व्यक्तिंवर दबाव आणला जातो. मग पुढे राजकीय आणि धार्मिक पातळीवर विचार केला तरी हे जाणवतं. या देशात मग फॅसिझम आहे का? महात्मा गांधींचा औद्योगिकीकरणाला विरोध होता आणि तो त्यांनी कधी लपवून ठेवला नाही. मग महात्मा गांधी फॅसिस्ट होते का? त्याचं उत्तर नाही असं आहे, कारण या विरोधामागचं कारण वेगळं होतं. त्यांना यांत्रिकीकरणामुळे लोकांचे रोजगार हिरावले जातील अशी भिती होती, जी सर्वच कामगार संघटनांना असते, म्हणून ते याच्या विरोधात होते. हा मानवतावादी विरोध होता. एरव्ही त्यांनी विरोध केला नसता. पण जर अशा पद्धतीचं कोणतं कारण नसेल तर?आधुनिकतेचा स्वीकार या देशात हळूहळू होतोय पण त्याला विरोध होतो असं म्हणता येणार नाही. तो होतंच नाही असंही नाही. संगणकीकरणाला लोकांचा विरोध होताच. पण तो आता मावळला. मोठ्या उद्योगधंद्यांना विरोध होतोच पण त्यामागे सामाजिक किंवा पर्यावरणाची कारणं असतात. त्याची उत्तरं शोधली की तो विरोध नाहीसा होतो. म्हणजे या देशात अशा पद्धतीचा फॅसिझम नाही का? तर तसंही नाही. आधुनिकतेचा स्वीकार हा जर इतरांना धाकात ठेवण्यासाठी म्हणून केला जात असेल तर तो फॅसिझमच आहे. आपण अण्वस्त्रसज्ज का व्हावं तर पाकिस्तान आणि चीनला धडा शिकवण्यासाठी. आपण पूर्वीही आधुनिक होतो हे सांगण्याचा अट्टहास का तर जगाचं गुरूपद मिळवण्यासाठी. असल्या छुप्या महत्त्वाकांक्षा जेव्हा आधुनिकीकरणामागे असतात तेव्हा ती आधुनिकता दिखावू आधुनिकता असते. असे प्रकार मोदी सरकार आल्यापासून मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहेत. कोणाला तरी धडा शिकवण्यासाठी, जगाचं तथाकथित पुरातनकालीन गुरूपद पुन्हा मिळवण्यासाठी वगैरे भाषा जेव्हा सुरू असते तेव्हा धोका असतोच. मग या देशात फॅसिझम खरंच आला आहे का?

Friday, 26 May 2017

भाग २ - मोदी सरकार आणि फॅसिझमचा धोका

इकोचं पहिलं सूत्र आहे परंपरावाद. हा परंपरावाद सर्वसमावेशक असायला हवा. यात वेगवेगळ्या विचारधारांचा समावेश असतो. सूटे करून पाहिल्यावर प्रत्येक विचारधारा ही आपल्याला पटू शकते पण प्रत्यक्षात त्या सर्व मिळून मूलभूत सत्य लपविण्याचंच काम करतात. त्यामुळे विचारधारांच्या या गाठोड्यात तुम्हाला शहाणपण कधीच मिळणार नाही. सत्यही मिळणार नाही. आपण फक्त त्या सत्याची पडछाया तेवढी पाहतो आणि त्यावरच समाधानी राहतो. भारताच्या परिस्थितीला परंपरावाद नवीन नाही. तसा तो कोणत्याच देशाला किंवा समाजाला नवीन नसतो. याचे तीन प्रकार असतात. जुन्या परंपरा पुढे चालवणे. पूर्णपणे नव्या परंपरा सुरू करणे आणि काही खोट्या परंपरा तयार करून त्या ख-याच आहेत असं सांगून त्या चालविण्याचा आग्रह धरणे. आपल्या देशात हे तिन्ही प्रकार सुरू आहेत. त्याला काहींचा विरोध आहे तर काहींचा पाठींबा आहे. या परंपरा सगळीकडे दिसून येतात, समाज, देश ते अगदी घरापर्यंत. त्यामुळे या परंपरा भयानक असू शकतात आणि त्यामागे फॅसिझम असू शकतो असं म्हटलं तर ते सहसा कोणाला पटू शकत नाही. या देशातील समृद्ध धार्मिक किंवा सामाजिक परंपरा लक्षात घेता हे विधान धाडसाचं वाटू शकेल. मग अडचण काय आहे? जेव्हा कोणत्याही परंपरा पाळण्याचा आग्रह केला जातो, किंवा त्या पाळण्याची इतरांवर सक्ती केली जाते आणि तसं करताना त्याचे मत लक्षात न घेता त्याला विरोध केला जातो आणि मग त्यासाठी काहीतरी भलतंच कारण सांगून त्याला कोंडीत पकडण्याचा डाव केला जातो आणि सामान्य लोकांचा पाठींबा मिळवला जातो तेव्हा अशी परंपरा ही इको म्हणतो त्याप्रमाणे फॅसिझममध्ये रुपांतरीत होऊ शकते. त्याची उदाहरणं पाहताना मी केवळ देशाची नव्हे तर समाज व त्यातील घटक तसेच कौटुंबिक परंपरांचाही विचार करेन. कुटुंब हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्याला दूर्लक्षून चालणार नाही. कारण वाईट परंपरेविरूद्धचा पहिला हुंकार आणि नव्या परंपरेची उभारणी ही घरातूनच केली जाते. आता याची उदाहरणं पाहूयात. भाजप सत्तेवर येण्याआधीपासूनच संघ या देशात सक्रीयपणे हिंदू परंपरांची जोपासना करण्यासाठी आग्रही आहे. त्यात चूकीचं काहीच नाही. पण संघ सर्वांना जेव्हा म्हणतो की या देशातले सर्व लोक हिंदू आहेत तेव्हा वाद निर्माण होतो. संघ जेव्हा म्हणतो की सर्व जाती एकसमान आहेत आणि त्यांनी एकाच वैदीक म्हणजेच ब्राह्मणी परंपरेचं पालन केलं पाहिजे तेव्हा धोका तयार होतो. आदिवासी लोकांना हिदूं म्हणायचं आणि त्यांच्या परंपरा डावलून हिंदू परंपरा सुरू करायच्या हे धोक्याचं आहे. संघ जेव्हा म्हणतो की सर्वांनी वंदे मातरम म्हटलंच पाहिजे नाही तर तुम्ही देशभक्त नाही तेव्हा धोका तयार होतो. संघ जेव्हा म्हणतो की या देशात उच्च दर्जाची शास्त्रिय परंपरा होती, या देशात सर्जरी होती, विमानं होती, राम होता कृष्ण होता आणि हे सारं खरं आहे अशी समजण्याची सक्ती जेव्हा इतरांवर केली जाते तेव्हा धोका असतो. आपल्या इतिहासाबद्दल अभिमान असायलाच हवा आणि आपल्याकडे तो अभिमानास्पद इतिहास आहेच, पण त्यात खोट्या तत्थ्यांची सरमिसळ करून काहीतरी काल्पनिक सत्य तयार करून जेव्हा ते खरं असल्याचा दावा केला जातो आणि त्याची सक्ती प्रेमानं किंवा धाकानं इतरांवर केली जाते तेव्हा धोका असतो. संघाचं उदाहरण यासाठी की त्यांचा या देशात मोठा प्रभाव आहे. पण तेच केवळ धोकादायक आहेत असं नाही. अन्य मुस्लिम जातीयवादी संघटना, हिंदू अंतर्गत जाती संघटना याही अशा पद्धतीचा धोका तयार करू शकतात. मी तेवढा बरोबर, माझी परंपरा तेवढी श्रेष्ठ, म्हणून तुम्हीही तीच पाळायची हा आग्रह किंवा या देशाचं काय वाट्टेल ते झालं तरी चालेल पण मी स्वतःचा स्वार्थ साधेन अशी प्रवृत्ती असलेल्या अन्य विचारधारा या दोन्हीही या देशासाठी आणि इथल्या लोकशाहीसाठी धोकादायक आहेत. परंपरा हा फार मोठा विषय आहे. राजकीय परंपरा पाहिल्या तरी या देशात कॉंग्रेसचं सरकार असल्यानं जी जीहुजुरेगिरीची परंपरा या देशात तयार झाली तिचा प्रचंड फटका आपल्याला बसलेला आहे. राजकारणी म्हणजे राजे आहेत किंवा देवच आहेत अशी भावना जनतेच्या मनात असेल तर हे लोकशाहीचं सर्वांत मोठं अपयश आहे. किंबहूना ती लोकशाही नाहीच. आपला देश थोडा विचित्रच आहे. इथे जेव्हा आणीबाणीच्या काळात लोकशाहीला धोका झाला तेव्हा याच सामान्य जनतेनं त्याला विरोध केला. पण ज्यांना निवडून आणलं ते सारे नालायक निघाले किंवा ते तसेच होते त्यामुळे पुन्हा एकदा इंदिरा सरकार सत्तेवर आलं आणि त्यांना त्याच सामान्य लोकांनी निवडून दिलं. आताही मोदी सरकारला याच जनतेनं निवडून दिलं आहे त्यामुळे लोकशाही मार्गानं आलेल्या या सरकारला नावं ठेवणं म्हणजे इथल्या लोकांना व इथल्या लोकशाहीला नावं ठेवण्यासारखं होईल. पण त्याचवेळी हीच जनता पुढे या सरकारला तिच्या अपयशांसाठी धडा शिकवायला मागेपुढे पाहणार नाही कारण तशीही परंपरा आपल्या इथे आहेच. थोडक्यात काय तर या देशातील काही परंपरा फॅसिझमला जशा पोषक आहेत तशाच काही परंपरा त्याला विरोध करण्यासाठीही अनुकूल आहेत. आपल्या इथली लोकशाही हीच फॅसिझमविरूद्ध लढण्यासाठी ढाल म्हणून आपल्याला उपयोगी पडणार आहे आणि याची जाणीव समोरच्यांनाही असल्यानं इथं फॅसिझम परंपरेच्या द्वारे लागू होण्याची शक्यता जाणवत नाही. त्याला विरोध हा होणारच. त्याची उदाहरणं आपण पाहिली आहेतच, मग तो वंदेमातरमचा वाद असो, दिल्ली विद्यापीठाचं प्रकरण असो किंवा गोमांस सेवनाचा मुद्दा असो. काही चुकीचं घडतं आहे हे लक्षात येताच त्याला विरोधही मोठ्या प्रमाणावर केला जातोय. आणि जोवर हे होत राहील तोवर आपण सुरक्षित असू. 

Thursday, 25 May 2017

भाग १ - मोदी सरकार आणि फॅसिझमचा धोका

काही दिवसांपूर्वी पुण्यात के. सच्चिदानंदन हे केरळमधील कवी, लेखक व सामाजिक कार्यकर्ता एका कार्यक्रमासाठी आले होते. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर आणि दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्यांच्या पार्श्वभूमिवर साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत करून जो निषेध केला होता त्यात सच्चिदानंदन यांचाही समावेश होता. पण ते तेवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी भारतातील अनेक क्षेत्रांतील समविचारी लोकांची एक संघटना तयार केली आहे. त्यांना अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर लिहायला सांगून त्याचे एक पुस्तक प्रसिद्ध केले आहे. ते आहे – वर्ड मॅटर्स – रायझिंग अगेन्स्ट द सायलेंस. या पुस्तकाच्या निमित्ताने साधना मीडिया सेंटरने एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात चंद्रकांत पाटील यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. त्यात भारताची सध्याची परिस्थिती फॅसिझमला अनुकूल आहे का की इथे याआधीच फॅसिझम येऊन पोहोचलाय याविषयी सच्चिदानंदन यांना पाटील यांनी उंबेर्तो इको या इटालियन लेखक, विचारवंताच्या - उर फॅसिझम - या पुस्तकाचा संदर्भ देत प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर हो असं देत सच्चिदानंदन यांनी त्याचं स्वरुप आणखी काही उदाहरणं देत स्पष्ट केलं होतं. त्याला अनुसरून ही पोस्ट आहे. इकोच्या मूळ पुस्तकात फॅसिझम कसा ओळखावा याची १४ सूत्रे दिली आहेत. त्यांच्या अनुषंगाने ही पोस्ट लिहीली आहे. जिज्ञासू मूळ पुस्तक वाचू शकतात ते एमेझॉनवर आहे. किंवा गुगलवर शोध घेऊन याविषयी अधिक माहिती घेता येईल. ज्यांना आपली मते या विषयावर द्यायची आहे त्यांचं स्वागत आहे.
मोदींशी माझे काही व्यक्तिगत हेवेदावे नाहीत की ते भाजप व संघाशी संबंधित आहे म्हणून मी आंधळेपणानं त्यांचा विरोधही करीत नाही. प्रत्येकात बरे-वाईट गुण असतात व त्यानुसारच त्या व्यक्तिचा विचार करायला हवा असं माझं मत आहे. त्यामुळे मोदींच्या चांगल्या गोष्टींना माझा पाठींबा आहे, स्वच्छ भारत योजना, गंगा स्वच्छ मोहिम किंवा अन्य योजना. आता त्या यशस्वी करण्याची जबाबदारी केवळ मोदी किंवा त्यांच्या सरकारची नसून ती प्रशासनाची व लोकांचीही असते. त्यावरच कोणत्याही योजनेची यशस्विता ठरत असते. त्याचवेळी मोदी सरकारच्या नेतृत्वकाळात गोध्रासारखं जे प्रकरण घडलं किंवा नंतरच्या काळात जी अनेक प्रकरणं घडली त्याचाही मला विसर पडलेला नाही. हा लेख तटस्थपणे लिहिण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात आला आहे. व्यक्तिगत पातळीवर कोण कोणत्या पक्षात आहे याचा विचार मी करीत नाही. पण जेव्हा ती व्यक्ति संस्थेशी जोडली जाते तेव्हा अशा हजारो व्यक्तिंच्या समावेशामुळे एखाद्या संस्थेची विशिष्ट विचारधारा तयार होते जिचा सामना करणं कठीण जातं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी मी बोलत आहे. पण केवळ तेच नाही तर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, अन्य हिंदू समित्या, मुस्लिम जातीयवादी संस्था, किंवा अन्य कोणत्याही धर्माच्या, जातीच्या संस्था, संघटना जेव्हा एकांगी, दुराग्रही, देशविघातक भूमिका घेऊन कार्य करते तेव्हा तेव्हा हा फॅसिझमचा धोका जाणवत असतो. मोदी स्वतः, त्यांचे सरकारातील लोक आणि भाजप व संघाशी संबंधित अन्य लोक यांच्या ज्या प्रकारच्या वल्गना सध्या सुरू आहेत व त्याला ज्या पद्धतीने अन्य लोकांकडून उत्तरे दिली जात आहेत, व या एकूण प्रकारात सामान्य जनता ज्या पद्धतीने व्यक्त होत आहे हे सारेच या देशासाठी, इथल्या लोकांसाठी, इथल्या लोकशाहीसाठी धोकादायक आहे. अगदी स्पष्टपणेच सांगायचं तर मोदी किंवा भाजप यांच्याविषयी काळजी करण्याचं काही एक कारण नाही. हे राजकीय पक्ष आहेत आणि त्यांना सत्ता सांभाळताना लवचिकपणे कसं वागावं हे समजतं. आपण ते बघतही आहोत. त्यांची कितीही इच्छा असली तरी त्यांना मनमानी करता येणार नाही. पण जेव्हा संघ किंवा त्यांच्याशी संबंधीत अन्य संघटना अथवा अन्य कोणत्याही जातीयवादी संघटना उघडपणे हे करा किंवा ते करू नका असले सल्ले देतात आणि त्याविरूद्ध जाणा-या लोकांचे जीव घेण्यापर्यंतही त्यांची मजल जाते तेव्हा ती अत्यंत धोकादायक बाब असते. राष्ट्रभक्ती किंवा अन्य कोणत्याही विचारधारेत गुंडाळलेली वचने असोत त्यातील छुपा अर्थ वेगळा तर नाही ना हे तपासून पाहण्याची गरज आहे. आता कोणी असंही म्हणेल की मी आधीच काही संस्थांना फॅसिझमवादी म्हणून मोकळा होतोय आणि मग त्यात निष्पक्षता कोठे आली आहे?  आता या संघटना कट्टरतावादी आहेत यात माझा दोष नाही. त्यामुळेच त्यांची नावं मी घेत आहे. पण आधी म्हटल्याप्रमाणे फक्त याच नव्हे तर अन्य संघटनांचाही मी यात समावेश केला आहे. त्यात अगदी खाप सारख्या जातपंचायती ज्या आपल्या देशात सगळीकडेच आहेत त्यांचाही समावेश होता. त्यात फतव्यांचाही समावेश होतो. उंबेर्तोच्या सूत्रांनुसार असा काही प्रकार या देशात कोणाकडून होतोय का याची फक्त ही तपासणी आहे. आणि तसं जर ते नसेल तर चांगलंच आहे. पण ते तसं असेल तर त्यासाठी बचावाची यंत्रणा उभारण्यात आपण तयार असलं पाहिजे. माझ्या प्रत्येक सूत्रावरील लिखाणात हा मुद्दा मी अधिक स्पष्ट करेन.
फॅसिझम म्हणजे एक विशिष्ट दुराग्रही एकांगी विचारसरणी असा अर्थ घेऊन इथे त्याविषयी भारताच्या सध्याच्या परिस्थितीविषयी काही सूत्रे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मी अभ्यासू संशोधक नाही. ही म्हटली तर माझी उणीव आहे किंवा म्हटलं तर एका अर्थानं ते उपयुक्तही ठरेल कारण मी जे संदर्भ देईन ते माझ्याशी संबंधित असतील. एखादा मुद्दा मांडल्यानंतर त्याचा माझ्याशी प्रत्यक्ष कितपत संबंध येतो हे महत्त्वाचं आहे. उदा. या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही असं आपण म्हटलं तर त्याचा माझ्याशी कितपत संबंध आहे हे मला सांगता येईल. म्हणजे मी जर सामाजिक माध्यमांवर या विषयावर लेख लिहू शकत असेन तर मी या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही असं थेट म्हणू शकत नाही. याचा अर्थ या देशात सारं ठिकठाक आहे असाही होत नाही. मी कदाचित नगण्य आहे त्यामुळे कोणाचं माझ्याकडे लक्ष जाणार नाही पण उद्या ते गेलं तर सरकार किंवा अन्य संस्था किंवा त्यांच्याशी संबंधित लोक माझ्याविरूद्ध शांतपणेच वागतील हे सांगता येणार नाही. त्यामुळे इथे भविष्याचाही संबंध येतो. हा लेख या सर्व गोष्टींचा विचार करून लिहिलेले आहेत. या देशातील एक नागरिक म्हणून माझ्या काही जबाबदा-या असतात. आपण असू म्हणूयात की हा त्याचाच एक भाग आहे. मला काही एक धोका वाटतोय म्हणून मी काही मतं व्यक्त करून त्याविषयी लोकांना काही सांगू इच्छितो, त्याचा काही उपयोग झाला तर चांगलच आहे. ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. त्या अनुषंगानेही हा लेख वाचण्यात यावा.
उंबेर्तो इकोचा जन्म १९३२ ला इटलीत झाला होता. त्यामुळे लहानपणापासून बेनिटो मुसोलिनीच्या फॅसिझमशी त्यांचा जवळून संबंध आला होता. मुसोलिनी मेल्यानंतरही हा फॅसिझम जीवंत राहिल्यामुळे आणि अन्यत्रही त्याचा अन्य रुपांमध्ये उदय झाल्यामुळे त्यांनी नंतरच्या काळात त्याविषयी आग्रही भूमिका घेत आपला विरोध कायम ठेवला. नंतर त्याविषयी अतिशय अभ्यासपूर्ण असे – उर फॅसिझम किंवा इटर्नल फॅसिझम अर्थात शाश्वत फॅसिझम हे पुस्तकही लिहिले. त्यात फॅसिझम हा मेलेला नाही आणि आता तो वेगवेगळ्या स्वरुपांत जगभरात वावरत आहे हे त्यांनी सांगितलं तसेच तो ओळखण्यासाठी १४ सूत्रे सांगितली. जी अतिशय चपखल आहेत. आपल्या देशात, आपल्या सभोवती फॅसिझम किंवा तत्सम परिस्थिती आहे की नाही हे शोधण्यासाठी त्यांचा निश्चित उपयोग होऊ शकतो. इको हे अतिशय प्रगल्भ लेखक होते. त्यांची द नेम ऑफ द रोझ, फोकॉल्ट्स पेंडुलम, द आयलँड ऑव्ह द डे बिफोर, द प्राग सेमिटेरी ही काही गाजलेली पुस्तके. त्यांचा चिन्ह व सांकेतिक भाषांचा दांडगा अभ्यास होता आणि आपल्या पुस्तकात त्यांनी त्याचा उपयोग केला आहे.
इको त्याच्या या पुस्तकात फॅसिझमविषयी लिहिताना म्हणतो की, फॅसिझमचे अनेक ऐतिहासिक प्रकार अस्तित्वात असले तरी त्याच्या काही वैशिष्ट्यांची नोंद करता येऊ शकते ज्यावरून या शाश्वत फॅसिझमची ओळख पटू शकते. या वैशिष्ट्यांना एक संघटीत स्वरुप नाही, त्यातील अनेक मुद्दे एकमेकांच्या विरोधातही जातात आणि त्यातील काही मुद्दे अन्य हुकुमशाही किंवा कट्टरतावादी विचारसरणीशी साधर्म्य सांगू शकतात. पण यातील एकही वैशिष्ट्य जर आपल्याला दिसत असेल तर हा फॅसिझम त्याच्या भोवती वाढू शकतो जर त्याला वेळीच अटकाव करण्यात आला नाही तर. हा फॅसिझम सध्या अत्यंत साध्या स्वरुपात आपल्या अवतीभवती वावरत असू शकतो. तो ओळखनं खूप सोपं गेलं असतं जर कोणी असं म्हटलं असतं की, मला पुन्हा छळछावण्या उघडायच्या आहेत किंवा काळा पोषाख घालून संचलन करायचं आहे.पण आयुष्य इतकं साधं सरळ नसतं. सध्याच्या काळात फॅसिझम अत्यंत निरागस स्वरुपातही आपल्यापुढे येऊ शकतो. आपल्या सर्वांचं कर्तव्य असायला हवं की त्याला उघडं पाडायचं आणि त्याचा तिथल्या तिथे विरोध करायचा, मग तो जगाच्या कोणत्याही भागात असो. स्वातंत्र्य आणि उदारता यांची जपणूक करणं, संरक्षण करणं ही आपल्या सर्वांची सर्वोच्च जबाबदारी असायला हवी.

मी यापुढे इकोने जी १४ सूत्रे दिली होती ती इंग्रजीतील खाली जशीच्या तशी दिली आहेत. त्याविषयीचं भाष्य मी तेवढं पुढे लिहिलं आहे. 

१- लेखकांचे कारखाने

सोशल मीडियाच्या प्रसारामुळे अनेकांना त्यावर लिहिणं सोपं झालंय आणि त्यावर मिळणा-या लाईक्स आणि कमेंट्स यामुळे आपण चांगलं लिहू शकतो असाही गैरसमज अनेकांना होत असतो. एकवेळ तोही परवडला पण त्याहीपुढे जाऊन काही लोकांना आपण चांगले लेखक झालो आहोत असाही साक्षात्कार घडत आहे. भरीस भर म्हणून काही संस्था अशा उत्साही लेखकांना हेरून त्यांना हरभ-याच्या झाडावर चढवून तुम्ही किती छान लिहिता वगैरे करून त्यांच्या या उत्साहाला खतपाणी घालण्याचं काम करत आहेत. ज्यामागे पैसा मिळवणे हा एकमेव छूपा उद्देश असतो. अशा हौशी लेखकांनी सोशल मीडिया भरलेला आहे. अशा लेखकांची ही भलती हौस पुरवणा-या संस्थाही ठिकठिकाणी कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवत आहेत. या लेखकांचं कोडकौतुक करायचं, त्यांचे लेख, कथा, कविता आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करायच्या, मग हळूच एखादं संमेलन भरवून त्यांना बोलवायचं, त्यांचे सत्कार करायचे असा एक पद्धतशीर उद्योग अनेक ठिकाणी पहायला मिळतो. तर काही ठिकाणी सामुहिक स्वरूपात लेखन छापण्याचे प्रकार सुरू असतात. त्यासाठी अर्थातच पैसे घेतले जातातच. या हौशी लेखकांचा जो बुजबुजाट सध्या सगळीकडे होत आहे त्याची ढेकणांच्या पैदाशीशीच तुलना करता येईल. अनेकांना याचा राग येईल पण सर्जनात्मक लिखाण ही काही खायची गोष्ट नाही. खाण्यासाठी व खाल्लेलं पचवण्यासाठीही चांगल्या आरोग्याची गरज असते. लिहिण्यासाठीही चांगल्या विचारशक्तिची गरज असते. पण ती आपल्याकडे आहे की नाही याचा विचार न करता केवळ आपण लिहिलेलं भरताड कुठेतरी प्रसिद्ध होतेय व त्याला कोणीतरी आवडून घेतंय यावरच सारे खूश होतात. या आवडण्यामागे त्या माणसाचा काय उद्देश आहे याचाही कोणी विचार करत नाही. तू मला छान म्हण व मी तुला छान म्हणतो असा हा सारा प्रकार आहे. या लेखकांच्या कारखान्यातून जे लेखक बाहेर पडतात त्यांना काळाच्या कसोटीवर काडीचंही स्थान असणार नाही. ना त्यांच्या लिखाणाला. पण ही समज त्यांना नाही. मराठी साहित्यावरची ही लेखकधाड लवकरच संपूष्टात येईल अशी आशा करूयात.