Saturday, 27 May 2017

भाग ३ - मोदी सरकार आणि फॅसिझम

परंपरावाद हा आधुनिकतेला नकार देतो. आपल्या घरापासून सुरूवात केली तरी हे स्पष्ट होतं. आपल्या आईवडीलांना आपले विचार पटत नसतात आणि आपल्याला त्यांचे. समाजात गेलो तर समाजाला काही गोष्टी खटकतात आणि त्यावरून व्यक्तिंवर दबाव आणला जातो. मग पुढे राजकीय आणि धार्मिक पातळीवर विचार केला तरी हे जाणवतं. या देशात मग फॅसिझम आहे का? महात्मा गांधींचा औद्योगिकीकरणाला विरोध होता आणि तो त्यांनी कधी लपवून ठेवला नाही. मग महात्मा गांधी फॅसिस्ट होते का? त्याचं उत्तर नाही असं आहे, कारण या विरोधामागचं कारण वेगळं होतं. त्यांना यांत्रिकीकरणामुळे लोकांचे रोजगार हिरावले जातील अशी भिती होती, जी सर्वच कामगार संघटनांना असते, म्हणून ते याच्या विरोधात होते. हा मानवतावादी विरोध होता. एरव्ही त्यांनी विरोध केला नसता. पण जर अशा पद्धतीचं कोणतं कारण नसेल तर?आधुनिकतेचा स्वीकार या देशात हळूहळू होतोय पण त्याला विरोध होतो असं म्हणता येणार नाही. तो होतंच नाही असंही नाही. संगणकीकरणाला लोकांचा विरोध होताच. पण तो आता मावळला. मोठ्या उद्योगधंद्यांना विरोध होतोच पण त्यामागे सामाजिक किंवा पर्यावरणाची कारणं असतात. त्याची उत्तरं शोधली की तो विरोध नाहीसा होतो. म्हणजे या देशात अशा पद्धतीचा फॅसिझम नाही का? तर तसंही नाही. आधुनिकतेचा स्वीकार हा जर इतरांना धाकात ठेवण्यासाठी म्हणून केला जात असेल तर तो फॅसिझमच आहे. आपण अण्वस्त्रसज्ज का व्हावं तर पाकिस्तान आणि चीनला धडा शिकवण्यासाठी. आपण पूर्वीही आधुनिक होतो हे सांगण्याचा अट्टहास का तर जगाचं गुरूपद मिळवण्यासाठी. असल्या छुप्या महत्त्वाकांक्षा जेव्हा आधुनिकीकरणामागे असतात तेव्हा ती आधुनिकता दिखावू आधुनिकता असते. असे प्रकार मोदी सरकार आल्यापासून मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहेत. कोणाला तरी धडा शिकवण्यासाठी, जगाचं तथाकथित पुरातनकालीन गुरूपद पुन्हा मिळवण्यासाठी वगैरे भाषा जेव्हा सुरू असते तेव्हा धोका असतोच. मग या देशात फॅसिझम खरंच आला आहे का?

No comments:

Post a Comment