विरोधी
मत असणं हे वैविध्यतेचं लक्षण असतं. पण फॅसिझममध्ये सामान्य लोकांना इतरांचं
काल्पनिक भय दाखवून, शत्रू देशांविरूद्ध भावना भडकवत ठेवून, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष
पिळवणूक करत त्यांचं हे भय पराकोटीला चढवणं आणि त्यांना कायम या भयात डांबून ठेवणं
हे फॅसिझमचं सूत्र आहे. फॅसिझम हा उघडपणे वांशिक असतो असं इको म्हणतो. आपल्या
देशाची विविधता हेच त्याचं बलस्थान आहे, वैशिष्ट्य आहे असं आपण म्हणतो, त्याचा आपण
सर्व आदरही राखतो. आणि हे मान्यच करायला पाहिजे की अशा पद्धतीचं जगणं जगात
अभावानंच आढळतं. आपण अशा गोष्टींचा अभिमान बाळगायला हवा. तो बाळगतोही. पण
त्याचवेळी असे अनेक घटक आहेत ज्यांना हे वैविध्य मान्य नाही. त्यांना अखंड भारत
हवा आहे. त्यांना सारे हिंदू हवे आहेत. त्यांना विरोधाचा स्वर मान्य नाही. त्यांना
विरोध करणं हे स्वतंत्रतेचं व विवेकाचं लक्षण असतं हे मान्य नाही. मी कोणाबद्दल
बोलतोय ते स्पष्ट आहे. ही संघाची विचारसरणी आहे. त्यांना एकच देश, एकच धर्म, एकच
विचारधारा, एकच संस्कृती हवी आहे. पण ती इतरांना हवी आहे की नाही याचा विचार
करायला ते तयार नाहीत. या देशात हिंदू बहुसंख्य आहेत म्हणून त्यांचं इतरांनीच
ऐकायलाच हवं असा त्यांचा आग्रह असतो. आणि अनेकांना यात काही वावगं वाटत नाही कारण
अत्यंत हुशारीनं या गोष्टी त्यांच्या डोक्यात भिनवलेल्या असतात. पण याला इतरांचं जाऊ
द्या हिंदूचाही विरोध आहे, असू शकतो हे त्यांना मान्य नाही. मग अशा विरोधकांनी
संस्कृतीविरोधी, धर्मविरोधी, देशविरोधी लेबलं लावून त्यांचा धिक्कार केला जातो.
इतरांची गोष्टच सोडा. हे झालं संघाचं. पण इतरांचं काय? त्यांचीही तिच स्थिती आहे. त्यामुळे फक्त संघाला दोष
देण्यात अर्थ नाही. या सा-यांना त्यांच्या मनातला एकसंध भारत हवा आहे, त्यांच्या
मनातली संस्कृती त्यांना इथे हवी आहे ज्यात स्वतंत्र विचारांना स्थान नाही. विरोधी
मताला मान नाही. विरोधी लोकांप्रती ज्यांना आदर नाही. काल्पनिक किंवा वास्तवाची
अवास्तव मांडणी करून लोकांना भयभीत करणं, त्यांचा बुद्धीभेद करणं, त्यांच्या
भावनांचा गैरफायदा घेऊन त्यांना भडकावनं, फसवणं हे सारे प्रकार या देशात सुरू
आहेत. या देशात फॅसिस्टवृत्ती नाहीत असं म्हणनं योग्य ठरणार नाही.
No comments:
Post a Comment