Thursday, 25 May 2017

१- लेखकांचे कारखाने

सोशल मीडियाच्या प्रसारामुळे अनेकांना त्यावर लिहिणं सोपं झालंय आणि त्यावर मिळणा-या लाईक्स आणि कमेंट्स यामुळे आपण चांगलं लिहू शकतो असाही गैरसमज अनेकांना होत असतो. एकवेळ तोही परवडला पण त्याहीपुढे जाऊन काही लोकांना आपण चांगले लेखक झालो आहोत असाही साक्षात्कार घडत आहे. भरीस भर म्हणून काही संस्था अशा उत्साही लेखकांना हेरून त्यांना हरभ-याच्या झाडावर चढवून तुम्ही किती छान लिहिता वगैरे करून त्यांच्या या उत्साहाला खतपाणी घालण्याचं काम करत आहेत. ज्यामागे पैसा मिळवणे हा एकमेव छूपा उद्देश असतो. अशा हौशी लेखकांनी सोशल मीडिया भरलेला आहे. अशा लेखकांची ही भलती हौस पुरवणा-या संस्थाही ठिकठिकाणी कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवत आहेत. या लेखकांचं कोडकौतुक करायचं, त्यांचे लेख, कथा, कविता आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करायच्या, मग हळूच एखादं संमेलन भरवून त्यांना बोलवायचं, त्यांचे सत्कार करायचे असा एक पद्धतशीर उद्योग अनेक ठिकाणी पहायला मिळतो. तर काही ठिकाणी सामुहिक स्वरूपात लेखन छापण्याचे प्रकार सुरू असतात. त्यासाठी अर्थातच पैसे घेतले जातातच. या हौशी लेखकांचा जो बुजबुजाट सध्या सगळीकडे होत आहे त्याची ढेकणांच्या पैदाशीशीच तुलना करता येईल. अनेकांना याचा राग येईल पण सर्जनात्मक लिखाण ही काही खायची गोष्ट नाही. खाण्यासाठी व खाल्लेलं पचवण्यासाठीही चांगल्या आरोग्याची गरज असते. लिहिण्यासाठीही चांगल्या विचारशक्तिची गरज असते. पण ती आपल्याकडे आहे की नाही याचा विचार न करता केवळ आपण लिहिलेलं भरताड कुठेतरी प्रसिद्ध होतेय व त्याला कोणीतरी आवडून घेतंय यावरच सारे खूश होतात. या आवडण्यामागे त्या माणसाचा काय उद्देश आहे याचाही कोणी विचार करत नाही. तू मला छान म्हण व मी तुला छान म्हणतो असा हा सारा प्रकार आहे. या लेखकांच्या कारखान्यातून जे लेखक बाहेर पडतात त्यांना काळाच्या कसोटीवर काडीचंही स्थान असणार नाही. ना त्यांच्या लिखाणाला. पण ही समज त्यांना नाही. मराठी साहित्यावरची ही लेखकधाड लवकरच संपूष्टात येईल अशी आशा करूयात.

No comments:

Post a Comment