इकोचं
पहिलं सूत्र आहे परंपरावाद. हा परंपरावाद सर्वसमावेशक असायला हवा. यात वेगवेगळ्या
विचारधारांचा समावेश असतो. सूटे करून पाहिल्यावर प्रत्येक विचारधारा ही आपल्याला
पटू शकते पण प्रत्यक्षात त्या सर्व मिळून मूलभूत सत्य लपविण्याचंच काम करतात.
त्यामुळे विचारधारांच्या या गाठोड्यात तुम्हाला शहाणपण कधीच मिळणार नाही. सत्यही
मिळणार नाही. आपण फक्त त्या सत्याची पडछाया तेवढी पाहतो आणि त्यावरच समाधानी राहतो.
भारताच्या परिस्थितीला परंपरावाद नवीन नाही. तसा तो कोणत्याच देशाला किंवा समाजाला
नवीन नसतो. याचे तीन प्रकार असतात. जुन्या परंपरा पुढे चालवणे. पूर्णपणे नव्या
परंपरा सुरू करणे आणि काही खोट्या परंपरा तयार करून त्या ख-याच आहेत असं सांगून
त्या चालविण्याचा आग्रह धरणे. आपल्या देशात हे तिन्ही प्रकार सुरू आहेत. त्याला
काहींचा विरोध आहे तर काहींचा पाठींबा आहे. या परंपरा सगळीकडे दिसून येतात, समाज,
देश ते अगदी घरापर्यंत. त्यामुळे या परंपरा भयानक असू शकतात आणि त्यामागे फॅसिझम
असू शकतो असं म्हटलं तर ते सहसा कोणाला पटू शकत नाही. या देशातील समृद्ध धार्मिक
किंवा सामाजिक परंपरा लक्षात घेता हे विधान धाडसाचं वाटू शकेल. मग अडचण काय आहे? जेव्हा कोणत्याही परंपरा पाळण्याचा आग्रह केला जातो,
किंवा त्या पाळण्याची इतरांवर सक्ती केली जाते आणि तसं करताना त्याचे मत लक्षात न
घेता त्याला विरोध केला जातो आणि मग त्यासाठी काहीतरी भलतंच कारण सांगून त्याला
कोंडीत पकडण्याचा डाव केला जातो आणि सामान्य लोकांचा पाठींबा मिळवला जातो तेव्हा
अशी परंपरा ही इको म्हणतो त्याप्रमाणे फॅसिझममध्ये रुपांतरीत होऊ शकते. त्याची
उदाहरणं पाहताना मी केवळ देशाची नव्हे तर समाज व त्यातील घटक तसेच कौटुंबिक
परंपरांचाही विचार करेन. कुटुंब हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्याला
दूर्लक्षून चालणार नाही. कारण वाईट परंपरेविरूद्धचा पहिला हुंकार आणि नव्या
परंपरेची उभारणी ही घरातूनच केली जाते. आता याची उदाहरणं पाहूयात. भाजप सत्तेवर येण्याआधीपासूनच
संघ या देशात सक्रीयपणे हिंदू परंपरांची जोपासना करण्यासाठी आग्रही आहे. त्यात
चूकीचं काहीच नाही. पण संघ सर्वांना जेव्हा म्हणतो की या देशातले सर्व लोक हिंदू
आहेत तेव्हा वाद निर्माण होतो. संघ जेव्हा म्हणतो की सर्व जाती एकसमान आहेत आणि
त्यांनी एकाच वैदीक म्हणजेच ब्राह्मणी परंपरेचं पालन केलं पाहिजे तेव्हा धोका तयार
होतो. आदिवासी लोकांना हिदूं म्हणायचं आणि त्यांच्या परंपरा डावलून हिंदू परंपरा
सुरू करायच्या हे धोक्याचं आहे. संघ जेव्हा म्हणतो की सर्वांनी वंदे मातरम म्हटलंच
पाहिजे नाही तर तुम्ही देशभक्त नाही तेव्हा धोका तयार होतो. संघ जेव्हा म्हणतो की
या देशात उच्च दर्जाची शास्त्रिय परंपरा होती, या देशात सर्जरी होती, विमानं होती,
राम होता कृष्ण होता आणि हे सारं खरं आहे अशी समजण्याची सक्ती जेव्हा इतरांवर केली
जाते तेव्हा धोका असतो. आपल्या इतिहासाबद्दल अभिमान असायलाच हवा आणि आपल्याकडे तो
अभिमानास्पद इतिहास आहेच, पण त्यात खोट्या तत्थ्यांची सरमिसळ करून काहीतरी
काल्पनिक सत्य तयार करून जेव्हा ते खरं असल्याचा दावा केला जातो आणि त्याची सक्ती
प्रेमानं किंवा धाकानं इतरांवर केली जाते तेव्हा धोका असतो. संघाचं उदाहरण यासाठी
की त्यांचा या देशात मोठा प्रभाव आहे. पण तेच केवळ धोकादायक आहेत असं नाही. अन्य
मुस्लिम जातीयवादी संघटना, हिंदू अंतर्गत जाती संघटना याही अशा पद्धतीचा धोका तयार
करू शकतात. मी तेवढा बरोबर, माझी परंपरा तेवढी श्रेष्ठ, म्हणून तुम्हीही तीच
पाळायची हा आग्रह किंवा या देशाचं काय वाट्टेल ते झालं तरी चालेल पण मी स्वतःचा
स्वार्थ साधेन अशी प्रवृत्ती असलेल्या अन्य विचारधारा या दोन्हीही या देशासाठी आणि
इथल्या लोकशाहीसाठी धोकादायक आहेत. परंपरा हा फार मोठा विषय आहे. राजकीय परंपरा
पाहिल्या तरी या देशात कॉंग्रेसचं सरकार असल्यानं जी जीहुजुरेगिरीची परंपरा या
देशात तयार झाली तिचा प्रचंड फटका आपल्याला बसलेला आहे. राजकारणी म्हणजे राजे आहेत
किंवा देवच आहेत अशी भावना जनतेच्या मनात असेल तर हे लोकशाहीचं सर्वांत मोठं अपयश
आहे. किंबहूना ती लोकशाही नाहीच. आपला देश थोडा विचित्रच आहे. इथे जेव्हा
आणीबाणीच्या काळात लोकशाहीला धोका झाला तेव्हा याच सामान्य जनतेनं त्याला विरोध
केला. पण ज्यांना निवडून आणलं ते सारे नालायक निघाले किंवा ते तसेच होते त्यामुळे
पुन्हा एकदा इंदिरा सरकार सत्तेवर आलं आणि त्यांना त्याच सामान्य लोकांनी निवडून
दिलं. आताही मोदी सरकारला याच जनतेनं निवडून दिलं आहे त्यामुळे लोकशाही मार्गानं
आलेल्या या सरकारला नावं ठेवणं म्हणजे इथल्या लोकांना व इथल्या लोकशाहीला नावं
ठेवण्यासारखं होईल. पण त्याचवेळी हीच जनता पुढे या सरकारला तिच्या अपयशांसाठी धडा
शिकवायला मागेपुढे पाहणार नाही कारण तशीही परंपरा आपल्या इथे आहेच. थोडक्यात काय
तर या देशातील काही परंपरा फॅसिझमला जशा पोषक आहेत तशाच काही परंपरा त्याला विरोध
करण्यासाठीही अनुकूल आहेत. आपल्या इथली लोकशाही हीच फॅसिझमविरूद्ध लढण्यासाठी ढाल
म्हणून आपल्याला उपयोगी पडणार आहे आणि याची जाणीव समोरच्यांनाही असल्यानं इथं
फॅसिझम परंपरेच्या द्वारे लागू होण्याची शक्यता जाणवत नाही. त्याला विरोध हा
होणारच. त्याची उदाहरणं आपण पाहिली आहेतच, मग तो वंदेमातरमचा वाद असो, दिल्ली
विद्यापीठाचं प्रकरण असो किंवा गोमांस सेवनाचा मुद्दा असो. काही चुकीचं घडतं आहे
हे लक्षात येताच त्याला विरोधही मोठ्या प्रमाणावर केला जातोय. आणि जोवर हे होत
राहील तोवर आपण सुरक्षित असू.
No comments:
Post a Comment