‘मोघ पुरुस’ हा पाली भाषेतला
शब्द आहे. त्याचा अर्थ होतो मूर्ख पुरुष. विश्वकर्मा प्रकाशन, पुणे, तर्फे ही
कादंबरी जानेवारी २०१८ मध्ये प्रकाशित होत आहे. ही कादंबरी लिहिण्याची माझी कधीच
इच्छा नव्हती. तिचा जो विषय आहे त्यावर कधीकाळी लिहावं लागेल असं मला वाटलंही
नव्हतं. त्याची गरजही नव्हती. देव, धर्म, जात, या सर्व गोष्टींतून मी फार आधीपासून
दूर गेलो होतो. माझ्यासाठी तो विषय संपला होता. मला कोणत्याच देवांत रस नव्हता,
कोणत्याही धर्माचं मला आकर्षण नाही आणि जात हा विषय माझ्यासाठी वर्ज्य आहे. या
तिघांनाही मी काडीचंही महत्त्व देत नाही आणि तरीही मी याच विषयांवर ही कादंबरी
लिहिली आहे. कारण मी जरी या गोष्टी मानत नसलो तरी त्यावर विश्वास असलेली अब्जावधी
माणसं या जगात आहेत. देव-धर्म-जातीच्या नावाखाली त्यांनी जे तांडव सुरू केलंय ते
मला अपरिचीत नव्हतं पण मला त्याच्याशी काही देणंघेणं आहे असंही वाटत नव्हतं. पण
काळासोबत माझे विचार बदलत गेले आणि मला वाटलं की मला जरी याचं महत्त्व नसलं तरी ते
इतरांना आहे आणि मला यापासून त्रास होत नसला तरी इतरांना जो त्रास होतो त्यामुळे
मला त्रास होतो. मी फक्त माझ्यापूरता विचार करू शकत नाही हे मला कळलं तेव्हापासून
मी या विषयांत पुन्हा लक्ष घालायला सुरूवात केली.
कारण मला त्रास होतो. मी देवा-धर्मांच्या
नावाखाली होणारे अत्याचार दूर्लक्षू शकत नाही. कोणावरही अत्याचार झाला की तो मला
माझ्यावरचा अत्याचार वाटतो. कोणालाही वाळीत टाकलं गेलं की मीच वाळीत टाकला गेलोय
असं वाटतं. कोणाचाही जीव घेतला जातो तेव्हा मीच मरत असतो. ही जाणीव मी टाळू शकत
नव्हतो. माझी संवेदनशीलता वाढल्यामुळे होणारा हा त्रास आहे आणि तो कमी करण्यासाठी
आपण काही करू शकत नाही याची जाणीव अधिक त्रासदायक होती. हे खरंच आहे. मी एकटा काही
हे जग सुधारू शकत नाही. मी फारतर स्वतःला या मूर्खपणातून दूर ठेवू शकतो. ते तर मी
करतच होतो. दुसरं म्हणजे या सर्वांना कोणत्यातरी माध्यमातून विरोध करणं. माझे
प्रयत्न यशस्वी झाले नाही तरीही निदान मी विरोध केलाय याचं समाधान तरी मला त्यातून
मिळू शकलं असतं. विरोधाचा माझा मार्ग म्हणून मी लिखाणाचा पर्याय निवडला.
लिखाण करणं मला सोपं होतं. मला त्यातून
समाधान मिळणार होतं आणि मला कोणाचा त्रासही होणार नव्हता. मी सुरक्षित होतो.
कुठंतरी मला माहित होतं की ही जाणीव चूकीची आहे, स्वार्थाची आहे. हा केवळ
पळकाढूपणा आहे. स्वतःचं फसवं समाधान आहे. त्याला सुरूंग लागणारच होता. तो लागला
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनं. मी ही कादंबरी त्याआधीच लिहायला सुरू केली
होती. पण ती तशीच पडून होती. दाभोलकरांच्या खूनानं मला हादरवलं. त्यांच्यासारख्या
निरलस माणसाची हत्या करण्याइतपत परिस्थिती विखारी झाली आहे हे लक्षात आल्यानंतर
माझं मन मला टोचू लागलं. मी माझ्या लिखाणांतून अधिक प्रखरपणे व्यक्त होऊ लागलो.
सामाजिक माध्यमांचा अधिक वापर करू लागलो.
धोक्यांची पूर्ण जाणीव ठेवून मी हे लिखाण
केलं होतं. त्यासाठी मी स्वतःच जबाबदार असणार होतो. माझी भिती नष्ट झाली आहे. पण
त्याची जागा एका दुःखानं घेतली आहे. हे दुःख आहे की अशी परिस्थिती आपण निर्माणच
कशी होऊ दिली? माणसाला माणसांपेक्षा इतर गोष्टी कधीपासून
महत्त्वाच्या वाटू लागल्या आणि त्यासाठी तो इतका अमानवीय कसा झाला? आपण शांतपणे का जगू शकत नाही? आपल्या नेहमीच्याच आयुष्यात कमी का अडचणी आहेत
म्हणून आपण आपलं हे जगणं या मूर्ख समजूतींपायी अधिक त्रासाचं करून घेतोय. मला अनेक
प्रश्न पडले आहेत. त्यांची उत्तरं कधी मिळतील मला माहित नाही.
माझ्यापुरतं मी हे एक काम केलं आहे. जे हे वाचतील त्यांनी ही निव्वळ
कादंबरी म्हणून वाचू नये. वेळ घालवण्यासाठी तर मूळीच वाचू नये. केवळ काही
वाचण्यासाठी म्हणूनही वाचू नये. वाचकांनी काय वाचावं किंवा कसं वाचावं व त्यातून
काय बोध घ्यावा असले नियम मी स्वतःही एरव्ही पाळत नाही आणि इतरांच्याही त्या
हक्काचा मी आदर करतो. पण प्रत्येक नियमाला जसा अपवाद असतो तसा तो यावेळी घडला आहे.
माझी इच्छा व विनंती आहे की प्रत्येकानं पूर्ण जबाबदारीनं ही कादंबरी वाचावी. ती
वाचून या संदर्भात त्याला ज्या माध्यमातून वाटेल त्यातून त्यानं आपला विरोध प्रकट
करावा. माणूस म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी ही कादंबरी आपल्याला प्रेरीत
करेल असा मला विश्वास आहे आणि तुम्ही देखिल त्या विश्वासाला योग्य तो न्याय द्याल
अशी खात्री आहे. आपण ही कादंबरी वाचा, त्यावर विचार करा, त्यावर चर्चा करा, टीका
करा, प्रत्येक गोष्टीची कठोर चिकित्सा करा, प्रश्न विचारा, वाद घाला, पण शांत राहू
नका. मी काही अंतिम सत्य लिहिलं आहे असा माझा दावा नाही. ते खरंही नाही. मी माझ्या
बुद्धीच्या कक्षेत जे विचार मला गवसले ते फक्त मांडले आहेत. ते सर्वांनी मानावेत
असा आग्रह मूळीच नाही. हे विचार योग्य आहेत की अयोग्य आहेत याचा विचार मात्र आपण
सर्वांनी करायला हवा. त्यात तुमच्याकडून भर पडायला हवी. मुख्य म्हणजे या विचारांना
सक्रीय आचारांचं बळ मिळायलं हवं. तर या लेखनाचं सार्थक होईल.

No comments:
Post a Comment