पुण्यातील, डॉ. मेधा
खोले यांनी त्यांच्याकडे स्वयंपाक करणा-या बाईविरूद्ध जात लपवून आपली फसवणूक
केल्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांच्यावर टीका होत आहे ती
ऐकल्या-वाचल्यानंतर मला येशू ख्रिस्ताची एक गोष्ट आठवत आहे. येशू एका गावात फिरत
गेला असताना त्याला तिथं एक जमाव दिसला जो एका बाईला शिक्षा देत होता. शिक्षा होती
दगडांनी ठेचून जीवंत मारायची. येशूनं तिचा गुन्हा काय असं विचारलं तेव्हा लोकांनी
सांगितलं की ती पापी आहे. ती वेश्या होती. येशूनं म्हटलं की ठीक आहे ती पापी आहे
तर तिला शिक्षा व्हायलाच हवी. फक्त इतकंच करा की ज्यानं आजवर कधी पाप केलं नसेल
त्यानंच तिला दगड मारायचा. ते ऐकताच सारे शांत झाले. त्या बाईवर मग एकही दगड फेकला
गेला नाही कारण जमलेल्या प्रत्येकानंच काहीनाकाही पाप केलं होतं.
खोले बाईंवर ज्या
पद्धतीनं टीका होत आहे ती बघताना मला सर्वांना विचारावसं वाटतंय की तुम्ही सारे
खरेच जात पाळत नाही का? आयुष्यात तुम्ही कधीच जातीचा फायदा घेतला नाही का? तुमच्यातील दलित, ओबीसी लोकांनी जातीवर आधारीत
आरक्षण घेतलं नाही का की त्याला विरोध केला आहे?
तुमच्यातील मराठा लोकांनी मराठा मोर्चांना पाठींबा दिला नव्हता का? निवडणूकीत तुमच्या जातीच्या उमेदवाराला मत दिलं
नाही का? जातवार आरक्षणं निवडणूकांमध्ये का करता, ती रद्द
करा यासाठी तुम्ही शासनाच्या विरोधात आंदोलन केलं होतं का? जातीचा दाखला तुम्ही घेतला नाही का आणि तुमच्या
मुलांनीही तो घेऊ नये यासाठी तुम्ही आग्रही राहीला आहात का? जातीवार आरक्षण रद्द व्हावं म्हणून तुम्ही कधी
तुमचा विरोध दर्शवला आहात का? तुम्ही तुमच्या
जातीबाहेरच्या मुलाशी-मुलीशी लग्न केलं आहे का? तुमच्या जातीच्या संमेलनाला
तुम्ही जात नाही का? जर तुम्ही हे सारं केलं असेल तरच तुम्हाला खोले
बाईंवर इतकी टीका करण्याचा अधिकार मिळतो अन्यथा नाही.
खोले बाई जात पाळत
असतील तर तो त्यांचा खासगी घटनादत्त अधिकार आहे आणि त्याच नव्हे तर या देशातले
काही हातावर मोजता येणारे अपवाद वगळले तर सारेच असा अधिकार गाजवतात. सारेच जात
पाळतात. तुम्ही विसरला असाल तर एकदा स्वतःलाच विचारा की तुम्ही खरंच जातीचा उल्लेख
करणं सोडून दिलंय का म्हणून? खोले बाईंनी काही
यादव बाईंची फसवणूक केलेली नाही. त्यांना जर सोवळ्यातला स्वयंपाक हवा असेल तर तो
मागण्याचा त्यांना अधिकार आहेच. फसवणूक यादव बाईंनी केली आहे. ती जरी त्यांची
असहायता असेल तरी त्या खोटं बोलल्या आणि कायद्यानं त्या चूक ठरतात. यात खोले
बाईंवर टीका करणा-यांनी हेही लक्षात घ्यावं की त्यांनी निदान त्यांच्या अपेक्षा
लपवून ठेवल्या नाहीत. त्या स्पष्टपणे सांगितल्या होत्या. त्यांच्यावर टीका
करणा-यांसारखं त्यांचं वागणं निदान दुटप्पी किंवा सोयीचं नाही. ज्यांच्या भावना
फालतू गोष्टींनी दुखावतात ते आज त्यांच्यावर जातीपातीचा आरोप करीत आहेत, जे स्वतः
जातीचे सारे फायदे उचलतात ते त्यांच्यावर टीका करताहेत, ज्यांनी जातीपातीचं मुळं
मजबूत करण्याशिवाय आयुष्यभर काही केलं नाही ते त्यांच्यावर जातीपातीचा दोष टाकत
आहेत यापेक्षा हास्यास्पद आणि लज्जास्पद गोष्ट नाही. खोले बाईंच्या काही अपेक्षा
असतील तर त्या त्यांनी सांगितल्या होत्या आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत तर
त्याविरोधात कारवाई करण्याचा त्यांना अधिकार आहेच. त्यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल
केला आहे. निवडणूकांमध्ये किंवा नोकरीच्या ठिकाणी जात प्रमाणपत्र द्यावं लागतं. ते
वैध नसेल तर ती निवडणू आलेल्या उमेदवाराला त्याच्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो,
नोकरदार माणसाला त्याची नोकरी सोडावी लागते, कारण ती फसवणूक असते. तिथं कधी तुम्ही
शासनाविरोधात जातपात पाळल्याचा आरोप केला आहे का? मग
खोले बाईंवर एवढा रोष का? त्यांनी जात पाळायची की नाही हा त्यांचा खासगी
प्रश्न आहे. कारण तसं करण्यापासून त्यांना कोणीही थांबवू शकत नाही. ते थांबवायचं
असेल तर देशातल्या सर्वांनाच थांबवावं लागेल.
तुमच्यातले सारे
गणेशोत्सवात नाचले असतीलच. जे नाचले नसतील ते कोणता ना कोणता देव पाळत असतील. हे
देव जातीधर्मांतूनच जन्माला आले आहेत. मग आधी गणेशोत्सव बंद करायला लावा. सारी
मंदिरं बंद करा, उपवास धरणं बंद करा, हरतालिका पाळणं आणि वडाला फे-या मारणं बंद
करा आणि मग खोले बाईंवर तुटून पडा. आपल्या घरात कसं काम करायला हवं आणि कोणी करायचं
हे ठरवण्याचा प्रत्येकालाच अधिकार आहे. सोवळं म्हणजे शुद्ध होऊन काम करणं. त्यात
काही गैर आहे असं नाही. आम्ही काही ब्राह्मण नाही पण आमच्या घरात आमची आई कधी आम्हाला
स्वयंपाकघरात इकडे तिकडे हात लावू द्यायची नाही. ती स्वतःही आंघोळ केल्यावरच कामं
करायची. मग आता तिच्यावर ती अस्पृष्यता पाळते असा आरोप लावायचा का मी? ती तिची मानसिकता आहे आणि तिचा अधिकार आहे. असाच
अधिकार आणि मानसिकता जर खोले बाई गाजवत असतील तर त्यांना का दोष द्यायचा? खोले बाईंनी जातीआधारीत नव्हे तर फसवणुकीसाठी
गुन्हा दाखल केला आहे. यादव बाईंनी त्यांना आधी सारं खरं सांगितलं असतं तर ही वेळच
आली नसती. जातीआधारीत भेदभाव करणं हा गुन्हा आहे. जात मानणं किंवा पाळणं हा अजून
या देशात गुन्हा नाही. तो जर असेल तर आख्ख्या देशाचाच तुरुंग करावा लागेल कारण
बहुतेक सारेच जात पाळतात.
खोले बाईंवर तुटून
पडण्यापेक्षा दूर्लक्ष करा कारण कायद्यानं त्या बरोबरच आहेत. त्यांना शिक्षा
करायची असेल तर आधी कायदे बदलावे लागतील. कारण निकाल देणा-या न्यायाधिशांची
नेमणूकही जातवार कोट्यातूनच होते हे कोणी विसरू नका. स्वतः जातीचे सारे फायदे
घ्यायचे आणि पुरोगामी म्हणूनही मिरवायचं हा दांभिकपणा आहे. म्हणूनच सारे उजव्या
विचारसरणीचे लोक तुम्हाला फुरोगामी, फेक्युलर, सर्वधर्मभक्षक म्हणून हिनवतात.
निदान ते तरी तुमच्यापेक्षा बरे कारण ते स्वतःची मतं लपवत नाही. पण तुम्ही ती
लपवता आणि सोयीनुसार वागता हे लक्षात घ्या. तुम्हा लोकांना खरंच जातीचा इतका
तिटकारा वाटत असेल तर खोले बाईंना विसरा, आधी तुम्ही आरक्षण घेणं बंद करा, मुलांची
जातीची प्रमाणपत्रं फाडून टाका, जातीचा उल्लेख असणारे सारे नियम, प्रमाणपत्र रद्द
करण्यासाठी सरकारवर दबाव आणा. मी दलित मी ब्राह्मण मी मराठा मी महार असले अभिमान
बाळगणं बंद करा. जातीवर ज्या नोक-या मिळवल्या असतील त्या सोडा आणि खासगीत
स्वतःच्या गुणवत्तेच्या बळावर नोक-या मिळवा.
भाऊ कदम यांनी गणपती
बसवला म्हणून त्यांच्यावरही दलित, बौद्ध संघटनांनी आगपाखड केली होती त्यांनाही
माझं विचारणं आहे की त्यांनी त्यांच्या घरातल्या बुद्ध आणि बाबासाहेबांच्या
प्रतिमा, पुतळे काढून टाकले आहेत का? कारण बुद्ध आत्मा
मानत नव्हता, देव मानत नव्हता. पण लोकांनी त्याचाच देव करून टाकला.
बाबासाहेबांचाही देव करण्यात आला आहे. दलित समाज आजही हिंदूंची कर्मकाडं करतो,
श्राद्ध करतो. ज्यांनी धर्मांतर करून ख्रिश्चन, मुसलमान धर्मांत प्रवेश घेतला तेही
आपल्या मूळ जातीच्या आधारावर आरक्षण मागतात. आपला देश इतका महान आहे की या दोन
धर्मांत जातीव्यवस्था नव्हती तर तीही आणली गेली. याचा विसर पडलाय का तुम्हाला?
सोयीनुसार एकमेकांना
जातीवरून झोडणारा, चुचकारणारा हा देश आहे. काही लोकांना आपल्या जाती लपवाव्या
लागतात, काही उन्माद आल्यासारखा त्याचा अभिमान बाळगतात, तर काही लोक आपली जात
पाळतात म्हणून इतर त्यांच्यावर आगपाखड करतात. जे जात पाळत नाही त्यांचीही अजात
नावाची नवीन जात तयार होते. असला येडझवा समाज आहे हा.
जातीच्या पापात सारा
देशच भागीदार आहे. त्यामुळे खोले बाईंना काही बोलण्याचा आपल्यातल्या कोणालाही
अधिकार नाही. त्या ब्राह्मण आहेत म्हणून सर्वांना त्यांच्यावर ओरडण्यात मजा येत
आहे. पण त्याचवेळी आपण जातपात पाळत नाही का याचाही विचार करा. दलित सर्रास
ब्राह्मणांविरूद्ध जातीवाचक शिविगाळ करतात. मराठा दलित आणि ब्राह्मणांनी शिव्या
घालतात आणि आता आरक्षण आपला हक्क आहे म्हणून मोर्चे काढताहेत. दलितही
त्यांच्यातल्या धर्मांतरीत लोकांविरूद्ध जातपात पाळतात. लग्नाच्या वेळी जातीपातीचे
व्यवहार कसे बारकाईनं पाळले जातात हे आधी बघा आणि मग खोले बाईंवर टीका करा.
या घटनेनंतर किती
लोक जातपातधर्म यांपासून स्वतःला मोकळं करणार आहे ते सांगा. खोले बाई महत्त्वाच्या
नाहीत. तुमची जातीय प्रवृत्ती यापुढे तरी जाणार आहे की नाही ते महत्त्वाचं आहे. मी
स्वतः आरक्षणाचे लाभ घेतले नाही. त्याच्यावर विश्वासही नाही. माझं जातीचं प्रमाणपत्र
जाळायला मी तयार आहे. खोले बाईंवर ज्यांनी टीका केली आहे त्या सर्वांना माझं जाहिर
आवाहन आहे की त्यांनीही माझ्यासोबत यावं. आपण या प्रमाणपत्रांची जाहिर होळी करूयात
आणि मग सरकारकडे सगळीकडून जातीचे उल्लेख हटवण्यासाठी मागणी करूयात. न्यायालयात तसे
खटले दाखल करूयात. शिवाय यापुढे सर्वांनी केवळ आपल्या नावाचाच उल्लेख करावा,
आडनावाचा करू नये यासाठीही चळवळ करूयात. म्हणजे कोण कोणत्या जातीधर्माचा आहे ते
कळणार नाही. आणि कोणालाही कोणतंही नाव घेण्याची मुभा असावी म्हणजे त्याची मूळ जात
धर्म काय आहे हेही कोणाला कळणार नाही. त्या खोले बाईंना जगू द्या त्यांना हवं तसं.
त्यानं काही फरक पडणार नाही. फरक तुमच्यामुळे पडणार आहे. तुम्ही जात सोडायला तयार
आहात की नाही ते आधी सांगा. आपण एक कार्यक्रम करून खालील गोष्टी करूयात.
१-
जाहिरपणे
तुमच्या व तुमच्या मुलांच्या जाती प्रमाणपत्रांची होळी
२-
शासनाला
निवेदन देऊन जातीआधारीत सर्व प्रमाणपत्रं, सोयी सुविधा रद्द करायला सांगू.
३-
न्यायालयात
जनहित याचिका दाखल करून देशातून सगळीकडून जात हद्दपार करण्यासाठी मागणी करू.
४-
जातीवार
आरक्षण रद्द करण्यासाठी शासनाला सांगू आणि न्यायालयात खटला दाखल करू.
खोले बाईंमुळे
जातीअंताची ही एक चांगली संधी मिळाली आहे आपल्याला ती वाया घालवू नका.
No comments:
Post a Comment