भारताच्या
स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात १८५७च्या शिपायांच्या उठावाला फार महत्त्व आहे. हा
एक सुनियोजीत उठाव होता पण ठरलेल्या दिवसाआधीच तो सुरू झाला त्याला कारण होती एक
तात्कालिक घटना. मीरतमधल्या ब्रिटीशांच्या सैनिक तळावर अशी अफवा पसरली होती की
बंदुकांच्या काडतुसांमध्ये डुकराची, गाईची चरबी मिसळलेली आहे. डुक्कर हे मुसलमानांना
अपवित्र आणि गाय ही हिंदूंना पवित्र. ही काडतूसं दातांनी तोडावी लागत असल्यानं या
दोन्ही समाजातील काही सैनिकांनी आपला धर्म भ्रष्ट होईल अशा भावनेनं असं करण्याचं
नाकारलं आणि त्यांतून बंडाची ठिणगी उडाली. हा इतिहास आपण सर्वांनीच वाचलेला आहे.
इतिहासापासून शिकायचं असतं असं म्हणतात. इतिहासाची नियमितपणे पुनरावृत्ती होत असते
असंही म्हणतात. हे सारं सांगण्याचं कारण म्हणजे सध्याच्या भाजप सरकारनं गोमांस
हत्या व गोमांस सेवन बंदी लादण्याचा घेतलेला निर्णय. त्यात भाकड जनावरं
विकण्यासाठी ठेवलेल्या अन्य ढिगभर अटींचाही समावेश आहे. दुसरी बातमी अशी आहे की
संघाच्या राष्ट्रीय मुस्लिम मंचातर्फे उत्तर प्रदेशांत नुक्तीच एक इफ्तार मेजवानी
आयोजित करण्यात आली ज्यांत मुस्लिम भाविकांनी गाईचं दूध पिऊन आपला रोजा सोडला.
आता
काही गोष्टी आपण बघुयात.
सारेच
मुसलमान काही मांसमच्छी खाऊन उपवास सोडत नाहीत. त्यांच्या या उपवासात मिठाया, फळं,
अन्य शाकाहारी पदार्थांचाही समावेश असतो. आणि गाईचं दूध मुसलमान पित नाही असंही
काही नाही. पण सध्याच्या गोमांस सेवनाच्या पार्श्वभूमिवर या गोष्टींना मोठी
प्रसिद्धी देण्यात येत आहे. शिवाय गोमांस हे आरोग्यासाठी घातक आहे असंही सांगितलं
जातं. गायीचं दूध पौष्टिक असतं हेही. शिवाय इस्लामच काय कोणताही धर्म गोहत्येची
परवानगी देऊ शकत नाही असा साक्षात्कारही या भाविकांना झाला आहे. फक्त त्याची वेळ व
जागा संशयास्पद आहे.
जगात
ख्रिश्चन समाज आहे ज्यांची सर्वांत जास्त लोकसंख्या आहे मुसलमानांच्या पाठोपाठ.
मुसलमान तर अव्वल आहेतच लोकसंख्येच्या बाबतीत. गेली शेकडो वर्षे जगाच्या
लोकसंख्येचा हा तीन चतुर्थांश भाग गायीचं मांस खात आला आहे. डुकराचं मांस खात आला
आहे. तरीही ते जीवंत आहेत. त्यांच्या लोकसंख्येत काही घट झाली नाही. याच माणसांनी
जगावर राज्य केलं. अजूनही हेच जगांत सर्वत्र आघाडीवर आहेत. केवळ आरोग्याचा विषय
पुढे करून जर भाजप किंवा संघ गोहत्या बंदी रेटू पहात असेल तर ही हास्यास्पद बाब
आहे.
दुसरा
मुद्दा आहे, आणि जो अधिक महत्त्वाचा आणि मूळ हेतू आहे, तो म्हणजे धर्माचा. हिंदू
धर्मांत गायीला माता मानण्यात येतं. विशेषतः कृष्णामुळे हे गायीचं गोमातेत रुपांतर
झालं आहे. गायीचा लहानपणी दुधासाठी उपयोग होतो, ते नंतरही आपण पितच असतो, शेतीसाठी
त्यांच्यामुळेच बैल मिळतात यामुळे शेतकरी वर्गालाही या प्राण्याविषयी ममत्त्व आहे.
गाय दिसायला सुंदर आहे आणि तिचा लळा लागतो हेही सांगायला नको. सर्वसामान्य भारतीय
हिंदू गायीला जास्त मानतो. त्यामागे ही सारी धार्मिक, आर्थिक, प्रेमाची कारण आहेत.
त्यामुळे बहुसंख्य हिंदूंना गायीचा लळा आहे आणि कोणी त्यांना आई मानतं यात नवल
नाही आणि त्याला कोणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही. हाच आक्षेप जर कोणी अन्नासाठी
गायीच्या मांसाचा उपयोग करत असेल तर त्याच्यावरही घेण्यात यायला नको. कारण
त्यालाही त्याची काही कारणं असतातच ज्यांचा आपण विचार करायला हवा.
सध्या
हे होत नाहीय. धर्माचा वापर करून गोहत्याबंदीचा पुरस्कार केला तर ते जड जाईल अशी
कल्पना संघ आणि भाजपला आता आल्यानं ते गाईचं मांस आरोग्याला हानिकारक आहे आणि दुध
पौष्टीक आहे असा प्रचार करत आहेत. बाकी हिदूं संघटना मात्र अजूनही आईपणातच अडकल्या
आहेत आणि आक्रमकपणे गोहत्या करणा-यांना, गोमांस खाणा-यांना फांसावर लटकवा अशी
वक्तव्ये करत आहेत. आपण कल्पना करूयात की तसं होईल आणि तसं झालं तर जगाची
अर्ध्याहून लोकसंख्या आपल्याला फांसावर लटकवावी लागेल. पण भारताबाहेरचे लोक भारतीय
हिंदूचं ऐकणार नाहीत याची खात्री असल्यानं इथल्याच लोकांवर याची सक्ती होत आहे.
असो.
गोमांस
खाणं किंवा दुध पिणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक आणि आर्थिक प्रश्न आहे. गायीचं दूध
महाग असतं त्यामुळं ते अनेकांना परवडत नाही. गायीच्या मांसाशिवाय अन्य मांस महाग
असल्यानं अनेकांना गोमांसाशिवाय पर्याय नसतो. यांत धार्मिक कारणापेक्षा आर्थिक
कारण अधिक प्रबळ आहे, असावं. त्यामुळे भाजपला जर खरोखरच मनापासून गोहत्या थांबवायची
असेल तर त्यानं दलित आणि मुसलमान यांच्यातील गरीब वर्गाची आर्थिक प्रगती कशी होईल
याकडे लक्ष देणं अधिक व्यावहारीक होईल. तसं जर झालं तर अनेक लोक गोमांसाच्या अधिक
चांगल्या पर्यायांकडे वळू शकतात. हा एक भाग झाला.
दुसरा
भाग आहे आणि जो अजूनही शिल्लक राहतो तो म्हणजे धर्माच्या आधारे जेवणसक्तीचा. केवळ
मला चालत नाही म्हणून तूही खायचं नाही ही सक्ती कधीही समर्थनीय ठरू शकत नाही. कारण
ब-याचदा खानपान हा एखाद्याच्या संस्कृतिचाही भाग असतो. पूर्वोत्तर राज्यांमध्ये
भाजप नेत्यांनीच गोमांस बंदीला विरोध केला आहे हे लक्षांत घ्यायला हवं. गोमांस
आरोग्यास हानीकारक आहे हा अत्यंत चूकीचा दावा आहे. केवळ आमची सत्ता आहे म्हणून
तुम्ही आमचं ऐकायलाच हवं याशिवाय अन्य कोणतंही कारण याला नाही. आणि हेच कारण आहे
ज्याला आमचा विरोध आहे.
असं
दिसतं आहे की भाजप आणि संघानं आता देशाचीच प्रयोगशाळा केली आहे आणि ते राहून राहून
एकेक गोष्ट आणत आहेत आणि त्याचा काय परिणाम होतो त्यानुसार पुढचं पाऊल टाकत आहेत.
आणखी काही नाही तर निदान लोकांना भडकावणं, त्यांच्यात फूट पाडणं, त्यांना भयभीत
करणं या गोष्टी तरी या लोकांना चांगल्या जमत आहे आणि वरची इफ्तार पार्टी हे कदाचित
याचं एक उदाहरण असू शकेल. जेव्हा भयापोटी विचार परिवर्तन होतं तेव्हा ते निकृष्ट
दर्जाचं आणि अस्थिरही असतं. भय जाताच परीवर्तनही जातं. जे समंजसपणानं परिवर्तनं
होतं ते स्थिर आणि उत्तम दर्जाचं असतं जे कायम टिकून राहतं. त्यामुळे उद्या जर
मुसलमानांनी गोमांस न खाण्याचा निर्णय घेतला तर त्याला विरोध करण्याचं कारण नाही
पण हा निर्णय कोणत्याही दबावापोटी घेतला नाही ना याची आधी खातरजमा व्हायला हवी.
तसं ते नसेल तर हा त्यांच्यावरचा अन्याय होईल.
मुसलमानांशिवाय
अन्य लोकांचाही प्रश्न आहेच. गोमांस नाही पण अन्य मांसाहार व मत्स्याहार करणारे
लाखो लोक या देशांत आहेत ज्यांच्यावर शाकाहाराची सक्ती केली जात आहे. मांसाहार
वाईट आहे आणि शाकाहार हा चांगला आहे अशी वरवरची कारणं असली तरी मूळांत तिच
धार्मिकता आणि मोठेपणा गाजवण्याचा हा प्रयोग आहे.
हिंदूंमध्ये
अशी एक भावना आहे की मुसलमान हे मांस आणि त्यातही गोमांस खातात म्हणून हिंदूपेक्षा
अधिक आक्रमक आहेत. मुसलमानांमध्येही गोमांस खाल्लं तर हिदूंपेक्षा वरचढ होता येईल
असा समज असतो. त्यामुळे मुसलमानांना आपल्या पायाखाली ठेवायचं असेल तर त्यांची ही
आक्रमकता मोडीत काढली पाहिजे आणि त्यासाठी गोमांसबंदी आणली पाहिजे असा हा भाबडा
कावा काहींचा असल्यास नवल नको. त्यापाठोपाठ उद्या अन्य मांसभक्षणावरही बंदी येईल.
प्रयोगांचे
निष्कर्ष कसे येतात त्यावरून ते सुरू ठेवावेत, बदलावेत, तीव्रता कमी करावी,
वाढवावी असे निर्णय घेतले जातात. खानपान बंदीचे हे प्रयोग याच स्वरुपाचे आहेत. पण
यामुळे देशाची अखंडताच धोक्यात येण्याची शक्यता आहे. हा धोका वरवर दिसणार नाही पण
आंतून आपल्यांतील अनेक बंध विसविशीत होत जातील यात शंका नाही.
१८५७च्या
उठावावेळी ज्या हिंदूंनी गोमांसयुक्त काडतूसं चावली नाहीत ती सारी शाकाहारीच होती
असं समजण्याचं कारण नाही. मुसलमानांचा प्रश्नच नव्हता. त्यांनी त्यांना अपवित्र
वाटणा-या गोष्टी नाकारल्या आणि त्यासाठी लढा दिला. तो एक तात्कालिक प्रश्न होता.
भारताच्या स्वातंत्र्याशी त्याचा संबंध जोडण्याची गल्लत कोणी करू नये. खानपानाच्या
स्वातंत्र्याशी मात्र त्याचा संबंध निश्चितच होता. हेच स्वातंत्र्य आजही लोकांना
आहे आणि त्यावर कोणी घाला घालत असेल तर त्याला विरोध व्हायलाच हवा. यात गोमांसाचं
समर्थन हा मुद्दा नाही तर ते मांस न खाण्याच्या सक्तीला विरोध आहे. हा मुसलमानांचा
अनुनय नाही की हिदूंना विरोध नाही ही गोष्टही आपण सर्वांनी लक्षांत घ्यायला हवी.
हे यासाठी महत्त्वाचं आहे की आज जर या सक्तीला आपण विरोध केला नाही तर उद्या आणखी
अन्य गोष्टींची सक्ती होईल. तेव्हा आपल्या विरोधाची धार बोथट झालेली असेल. ते होऊ
नये यासाठी आपण सर्वांनीच सजग राहण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment