Sunday, 4 June 2017

भाग ८ - मोदी सरकार आणि फॅसिझमचा धोका

सवर्ण उच्च वर्ग फॅसिझममधून तयार होतो. या विचारसरणीला स्वीकारणारे सारे उच्च वर्णीय असतात, ते श्रेष्ठ असतात आणि या वर्गाला गरीबांविषयी, दुबळ्या लोकांविषयी घृणा असते. फॅसिस्ट नेते बळाच्या वापराने सत्ता बळकावतात आणि त्यांची अशी ठाम समजूत असते की देशातील दीनदुबळ्यांचा उद्धार करण्यासाठी त्यांना सत्तेचं जोखड घ्यावंच लागेल कारण त्यांना अशा एखाद्या बलवान शासकाची गरज असते असं इको सांगतो. भारतात हे शक्य आहे का? इथे जातीभेद वर्गभेद पूर्वीपासूनच होता. ज्या नेत्याचं वर्णन इको करतो तसे नेते या देशात होऊन गेले आहेत. जनतेच्या मनाची काळजी त्यांपैकी कोणीही घेतली नव्हती. जनतेलाही कोणता राजा सत्तेवर आहे याची फारशी काळजी नव्हती कारण त्यांची आयुष्यं पूर्वी आणि आताही तशीच पिळवणूकीचीच असणार होती. पण या नेत्यांनी बळकावलेली सत्ता लोकांनीची त्यांना बहाल केली तर? मोदी सरकारने गुजरातमध्ये गोध्रामध्ये जे काही केलं किंवा नाही केलं त्यानंतरही या देशातील लोकांनी मोदींना सत्ता दिली आहे हे अमान्य करण्यात अर्थ नाही. मग ही जनतेची चूक आहे का? की मोदींवर जनतेनं विश्वास टाकला म्हणून मोदींनाही आपल्या कार्यशैलीत व विचारसरणीत बदल करावा लागला हे जनतेचं यश मानायचं का? सत्तेत येण्याआधी व नंतरही मोदींनी राम मंदिराचा मुद्दा बाहेर काढला नाही. लालकृष्ण आडवानी ज्यांना राम रथ यात्रा काढली होती त्यांनीही हा मुद्दा उपस्थित केला नाही, विंहिप, बजरंग दल यावर फारसे बोलत नाही. याचा अर्थ काय घ्यायचा? त्यांना मोदींनी गप्प बसवलं आहे का की ते सारे वातावरणनिर्मिती करत योग्य वेळेची वाट बघत आहेत असा घ्यायचा? पूर्ण बहुमत लाभूनही मोदी सरकार मनमानी करू शकत नाही हे लोकशाहीचं यश आहे. इको म्हणतो तसं मोदी हे भारताला पूर्वीचं वैभव मिळवून देण्याच्या घोषणा करतात, पूर्वी सारं वाईट होतं आणि आता आपण सारं काही सुरळीत करू असे दावे वारंवार करतात, ते सवासो करोड भारतीयांची गोष्ट वारंवार करतात, ते मन की बात करतात, पण ते अडचणीच्या प्रश्नांवर एकतर भाष्य करत नाहीत किंवा ते मग या गोष्टींना विरोध करतात पण त्यात काही जोर नसतो. ते इको म्हणतो तसं फॅसिस्ट नेते आहेत का? ज्याला अशी मनोमन खात्री आहे की या देशातील गरीब जनतेचं भलं करण्यासाठीच पंतप्रधानपदी निवडण्यात आलं? त्यांना जेव्हा विकासपुरूष म्हटलं जातं तेव्हा त्यांची ५६ इंची छाती अभिमानानं ६५ इंची होत असेल का?

No comments:

Post a Comment